सय्यद शकिल/अकोट प्रतिनिधी...
भारतीय कृषी निगम (CCI) कडून कापूस खरेदी करूनही शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. हे रोखलेले देयक तात्काळ वितरित करावे, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रवीराज मोरे यांनी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या लढ्याला प्रशांत डिक्कर व शिवराम पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.यावेळी प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली. बाजार समितीने मध्यस्थी करून सीसीआयने अडवून ठेवलेले पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाने पुढील दोन दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास 'स्वराज्य पक्ष' ताकदीने रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर स्वतःला झोकून देऊन बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसणारे सामाजिक कार्यकर्ते रवीराज मोरे यांचे धैर्य आणि जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे. अकोटच्या मातीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी असा कणखर लढा उभारणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे, सत्तेच्या किंवा पदाच्या राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत प्रशांत डिक्कर यांनी तात्काळ उपोषण मंडपाला भेट देऊन दिलेला भक्कम राजकीय आणि नैतिक आधार अत्यंत प्रेरणादायी आहे. हा लढा आता अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.दुसरीकडे, शेतकरी राजा घाम गाळून पिकवतो, पण त्याच्या घामाचे पैसे मिळवण्यासाठी त्याला उपोषणासारखा मार्ग स्वीकारावा लागतो, ही यंत्रणेसाठी लाजीरवाणी बाब आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीची भूमिका यात अत्यंत संशयास्पद आणि मूग गिळून बसल्यासारखी आहे. मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या बाजार समितीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे होते, परंतु त्यांचे मौन कॉर्पोरेट धोरणांना पाठीशी घालणारे आहे. CCI (भारतीय कृषी निगम) ची मनमानी आणि केंद्र-राज्य सरकारची शेतकरी विरोधी धोरणे यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. कापूस विकूनही हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना सरकारचे या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपण्यासारखे आहे. प्रशासनाने आता तरी गांभीर्य दाखवून शेतकऱ्यांचे पैसे त्वरित अदा करावेत, अन्यथा उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.असा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे. यावेळी शिवराम डिक्कर, उज्वल चोपडे, अभिषेक पाटील, विशाल पाटील, वैभव मुरुख, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
