पिंपळगाव काळेच्या सहकार विद्या मंदिरात देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...


 पिंपळगाव काळेच्या सहकार विद्या मंदिरात देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...

जळगाव जामोद (प्रतिनिधी);

सहकार विद्या मंदिर, पिंपळगाव काळे येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सहकार विद्या मंदिरचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ.किशोरजी केला यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.तिरंगा डौलाने फडकताच राष्ट्रगीत, देशभक्तिपर घोषणांनी आणि भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.किशोर केला होते. यावेळी महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद, जळगाव जामोद केंद्राच्या अध्यक्षा तथा सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद, वरवट बकाल, दानापूर व पिंपळगाव काळेच्या मुख्य संयोजिका डॉ. सौ. स्वाती केला मॅडम, सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य विनायक उमाळे, बुलढाणा अर्बन पिंपळगाव काळे शाखेचे शाखा व्यवस्थापक विजय मानकर तसेच सहकार विद्या मंदिर पिंपळगाव काळेच्या पर्यवेक्षिका कु. वैष्णवी चतारे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक पी.टी. प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली. शिस्तबद्ध हालचाली, तालबद्ध संचलन आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून शिस्त, एकता व राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला.

के.जी.-१ व के.जी.-२च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी वातावरण भावूक केले.विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तिपर भाषणांतून स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, तिरंग्याचे महत्त्व, देशाप्रती कर्तव्य आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीची जबाबदारी याबाबत मनोगत व्यक्त केले.यावेळी डॉ. सौ. स्वाती केला यांनी देशाविषयी प्रेम, अभिमान आणि कर्तव्यभावना जोपासण्याचे आवाहन केले.स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी देशप्रेम मनात रुजवून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्री. किशोर केला  यांनीही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार व कर्तव्यनिष्ठ नागरिक बनण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ताठे यांनी प्रभावीपणे केले, तर प्रास्ताविक प्रीती अवचार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार विद्या मंदिरचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटातून प्रोत्साहन मिळाले. शिक्षकांचे नियोजन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अधिकच रंगतदार झाला.विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांच्या एकत्रित सहभागातून पिंपळगाव काळे येथील स्वातंत्र्यदिन सोहळा राष्ट्रप्रेम, संस्कार, शिस्त आणि एकतेचा प्रेरणादायी उत्सव ठरला.

Previous Post Next Post