जळगाव जामोद(प्रतिनिधी);
विद्यार्थ्यांनी च्या सुरक्षेला प्राधान्य देत जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या ‘दामिनी’ पथकाच्या वतीने त्रिमूर्ती कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आसलगाव बाजार येथे गुरुवार, २० ऑगस्ट रोजी विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शाळा-महाविद्यालयात ये-जा करताना घ्यावयाची खबरदारी,अनुचित प्रसंगांना सामोरे जाण्याची पद्धत तसेच स्वसंरक्षणाचे महत्त्व याबाबत विद्यार्थिनींना विविध उदाहरणांसह माहिती देण्यात आली.विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळणे,संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ पालक अथवा शिक्षकांना माहिती देणे, अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची मदत घेणे आणि कोणत्याही प्रकारचा त्रास सहन न करता त्याविरोधात आवाज उठवणे, याबाबत दामिनी पथकाने मार्गदर्शन केले.विद्यार्थिनींनी कोणत्याही अनुचित प्रकारामुळे घाबरून किंवा खचून न जाता प्रसंगावधान राखावे, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.अत्याचार अथवा छेडछाडीच्या घटना सहन न करता त्याची वेळीच माहिती संबंधित व्यक्तींना देणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल प्राजक्ता चिमकर आणि अर्चना माटे यांनी विद्यार्थिनींना सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनीही विविध प्रश्न विचारून सुरक्षिततेसंदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेतली.‘भयमुक्त वातावरणात शिक्षण आणि निर्भीडपणे जीवन जगणे हा प्रत्येक विद्यार्थिनीचा अधिकार आहे,’ या भावनेतून घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थिनींनी स्वागत केले.यावेळी त्रिमूर्ती कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या विद्या काटले यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
