देशभक्तीपर गीत, घोषवाक्य, रांगोळी, निबंध स्पर्धा अन् ग्रंथप्रदर्शन; ‘माझा भारत, माझा अभिमान’मधून विद्यार्थ्यांनी व्यक्त केला देशप्रेमाचा जागर...
जळगाव जामोद(प्रतिनिधी);
जळगाव शिक्षण मंडळाद्वारा संचालित श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ८०वा स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्य दिन सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ९ ते १५ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध देशभक्तीपर, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीर व शहीद जवानांना अभिवादन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.सप्ताहाच्या कालावधीत देशभक्तीपर गीत गायन, भव्य तिरंगा रॅली, स्वातंत्र्यलढ्यावर आधारित घोषवाक्य लेखन, देशभक्तीपर रांगोळी स्पर्धा आणि ‘माझा भारत, माझा अभिमान’ या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांतून देशप्रेमाची भावना व्यक्त केली. तिरंगा रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला.
ग्रंथप्रदर्शनातून वाचन संस्कृतीला चालना
८०वा स्वातंत्र्य दिन तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विशेष ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात स्वातंत्र्यलढा, राष्ट्रपुरुषांचे जीवनकार्य, भारतीय संविधान, इतिहास, साहित्य तसेच विविध ज्ञानशाखांशी संबंधित पुस्तकांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पुस्तकांची माहिती घेतली. वाचनातून ज्ञानवृद्धी, चिंतनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध सामाजिक बांधिलकीच्या शपथा देण्यात आल्या. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी व्यसनांपासून दूर राहणे, सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींचा सन्मान करणे तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत कोणत्याही गैरप्रकाराचा अवलंब न करता कॉपीमुक्त अभियानाला सहकार्य करणे, याबाबत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, शिस्त आणि आदर्श नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष समूहगायनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकसुरात ‘वंदे मातरम्’चे गायन करून परिसरात देशभक्तीची ऊर्जा निर्माण केली. राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्राभिमान अधिक दृढ झाला.
१५ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीताने वातावरण देशभक्तीमय झाले. यावेळी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संदेश देण्यात आला.या संपूर्ण सप्ताहाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी, जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव मिलिंद जोशी, अधीक्षक संजय गाडेकर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. जी. एस. वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राजीव देवकर, प्रा. ऋषिकेश कांडलकर, प्रा. गणेश जोशी, प्रा. विनोद बावस्कर, प्रा. रामेश्वर सायखेडे, प्रा. नीलिमा भोपळे, ग्रंथपाल प्रा. संतोष कतोरे, समाधान निलजे, गजानन वानखडे, बाबुराव चव्हाण, प्यारेलाल डाबेराव, योगेश तायडे, हर्षद धर्मे व मानसी कुळकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.
