राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अविनाश जगन्नाथ उमरकर यांची नियुक्ती...


 राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अविनाश जगन्नाथ उमरकर यांची नियुक्ती...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) राज्यनिहाय राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या (RGRS) प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली असून, महाराष्ट्रासाठी  अविनाश जगन्नाथ उमरकर यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, काँग्रेस अध्यक्षांनी संबंधित राज्यांसाठी राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण जबाबदारी अविनाश जगन्नाथ उमरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.अविनाश उमरकर यांची नियुक्ती महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संघटनात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या माध्यमातून पंचायतराज व्यवस्था अधिक सक्षम करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे, संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच काँग्रेसचे विचार आणि धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असणार आहे.

अविनाश जगन्नाथ उमरकर यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा होताच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि विविध स्तरांतील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळेल, तसेच संघटनेला तळागाळात अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आगामी काळात राज्यातील विविध जिल्हे, तालुके आणि ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी उमरकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही मूल्ये, पारदर्शकता आणि जनसहभाग वाढविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

Previous Post Next Post