पळशी झाशीमध्ये धाडसी घरफोडी; ६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल लंपास!दोन लोखंडी अलमारी फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला; तामगाव पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...


 पळशी झाशीमध्ये धाडसी घरफोडी; ६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल लंपास!दोन लोखंडी अलमारी फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला; तामगाव पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...

बुलडाणा जिल्हा (प्रतिनिधी);

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत तब्बल ६ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास श्रीकृष्ण मारोडे (रा. पळशी झाशी, ता. संग्रामपूर) हे घराबाहेर असताना दि. २० ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला.चोरट्याने घरातील दोन लोखंडी अलमारींचे लॉकर फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १९१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे ५ लाख ३४ हजार ८०० रुपये किमतीचे, २५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, किंमत १० हजार रुपये, तसेच १ लाख रुपये रोख असा एकूण ६ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २८२/२०२६ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४) व ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, चोरीच्या या धाडसी घटनेचा तपास तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीकांत निचळ  स्वतः करीत आहेत.या चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

Previous Post Next Post