बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी):
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असून, दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी संत नगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. श्रींच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी मंदिर परिसरात टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि वारकऱ्यांच्या भक्तिमय उपस्थितीने वातावरण भारावून गेले होते.सरसंघचालक मोहन भागवत मंदिरात दाखल होताच मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात त्यांचे झालेले स्वागत विशेष लक्षवेधी ठरले. दर्शनानंतर मोहन भागवत यांनी मंदिर प्रशासनाशी संवाद साधत श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि सेवाभावी उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली.
•हावडा एक्सप्रेसने शेगावमध्ये आगमन...
मोहन भागवत यांचे आज सकाळी सुमारे ६ वाजता हावडा एक्सप्रेसने शेगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रेल्वे स्थानकावर उत्साहात त्यांचे स्वागत केले. यावेळी संघ कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
•नगर कार्यवाह आशिष ओम पांडे यांच्या निवासस्थानी अल्पोपहार.....
रेल्वे स्थानकावर स्वागत स्वीकारल्यानंतर मोहन भागवत यांनी शेगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह आशिष ओम पांडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी अल्पोपहार घेतला. त्यानंतर त्यांनी थेट श्री संत गजानन महाराज मंदिर गाठून श्रींचे दर्शन घेतले.
•टाळ-मृदुंगाचा गजर अन् हरिनामाचा जयघोष...
मंदिरात प्रवेश करताच वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोहन भागवत यांचे स्वागत केले. भक्तिमय वातावरणात त्यांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिर प्रशासनाकडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी संस्थानच्या कार्याची माहिती जाणून घेत सेवाभावी उपक्रमांविषयीही संवाद साधला.
•शेगाव परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था..
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहरासह परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक, मंदिर परिसर तसेच त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमवेत शेगाव तालुका संघचालक श्रीराम पुंडे, खामगाव वरून बँकेचे अध्यक्ष प्रा. विजय पुंडे यांच्यासह संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.श्रींच्या चरणी दर्शन घेऊन सुरू झालेल्या मोहन भागवत यांच्या शेगाव दौऱ्यामुळे संत नगरीत धार्मिक आणि संघटनात्मक वातावरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
