‘प्रेम वाहिनी रथ’ श्री सत्यसाईबाबांच्या पावन पादुकांचे ११ ऑगस्टला जळगाव जामोद येथे मंगल आगमन!


प्रेम वाहिनी रथ’ श्री सत्यसाईबाबांच्या पावन पादुकांचे ११ ऑगस्टला जळगाव जामोद येथे मंगल आगमन!

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

भगवान श्री सत्यसाईबाबांनी संपूर्ण मानवजातीला दिलेला ‘सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा’ तसेच ‘नेहमी मदत करा, कधीही कुणाला दुखवू नका’ हा मानवतेचा अमूल्य संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या श्री सत्यसाई प्रेम वाहिनीच्या पावन पादुका रथाचे मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जामोद नगरीत मंगल आगमन होणार आहे.श्री सत्यसाईबाबांच्या पावन पादुकांसह ‘प्रेम वाहिनी रथ’ भारतभर भ्रमण करीत असून, प्रेम, सेवा, शांती, सत्य, धर्म आणि मानवी मूल्यांचा दिव्य संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे. जळगाव जामोद येथे या पवित्र रथाच्या आगमनामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.दिनांक ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बऱ्हाणपूर रोडवरील देवाशिष लॉन येथे श्री सत्यसाईबाबांच्या पावन पादुका भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. यावेळी जळगाव जामोद शहर व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच भजनी मंडळांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून पादुकांचे दर्शन घ्यावे आणि प्रेम वाहिनी रथाचे उत्स्फूर्त स्वागत करावे, असे आवाहन सत्यसाई सेवा समिती, जळगाव जामोद यांच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता देवाशिष लॉन येथून श्री सत्यसाईबाबांच्या पावन पादुकांसह प्रेम वाहिनी रथाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

ही शोभायात्रा गजानन महाराज मंदिर रोड, डीपी रोड, दुर्गा चौक, महासिद्ध अर्बन बँक, नांदुरा अर्बन बँक, जुना बाजार, माळीखेल, आंबा माता मंदिर परिसर, कॉटन मार्केट रोड, महासिद्धिमहाराज मंदिर रोड, उटी, वडशिंगी आणि येनगाव या मार्गावरून जाणार आहे.या शोभायात्रेत शहरातील भजनी मंडळी, भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच शोभायात्रेच्या मार्गावर पाणी शिंपडून, रांगोळ्या काढून आणि पादुकांचे पूजन करून या पवित्र सोहळ्याचे स्वागत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.भगवान श्री सत्यसाईबाबांनी दिलेल्या प्रेम, सेवा, शांती, सत्य, धर्म आणि मानवतेच्या जीवनमूल्यांचा अंगीकार करण्याची संधी या पावन सोहळ्याच्या निमित्ताने जळगाव जामोदकरांना मिळणार आहे. अधिकाधिक भाविकांनी या आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होऊन पावन पादुकांचे दर्शन घ्यावे आणि मानवसेवेचा संकल्प करावा, असे आवाहन सत्यसाई सेवा समिती, जळगाव जामोद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post