समाजवादी पक्षाच्या पाठपुराव्याला अखेर यश!पुरात वाहून गेलेल्या महादेव वाघोदे यांच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाखांची आर्थिक मदत...


 समाजवादी पक्षाच्या पाठपुराव्याला अखेर यश!पुरात वाहून गेलेल्या महादेव वाघोदे यांच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाखांची आर्थिक मदत...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

 जळगाव जामोद शहरातील सिद्धार्थनगर भागात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या महादेव जगदेव वाघोदे यांच्या कुटुंबाला अखेर शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा जळगाव जामोद नगर परिषदेचे नगरसेवक सय्यद नफीस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, आमदार डॉ. संजय कुटे, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे आणि तहसीलदार पवन पाटील यांच्या तत्परतेमुळे ही मदत कुटुंबाला मिळू शकली.दि. ३१ जुलै २०२६ रोजी जळगाव जामोद शहरातील सिद्धार्थनगर भागात ५५ वर्षीय महादेव जगदेव वाघोदे हे अचानक पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाघोदे हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून, त्यांच्या पश्चात वृद्ध आई आणि मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असलेली व्यक्तीच गेल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते.

ही परिस्थिती लक्षात घेऊन समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद नफीस यांनी प्रशासनाकडे निवेदन देत वाघोदे कुटुंबाला तातडीने शासकीय आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. तसेच आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निधीतूनही मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती.समाजवादी पक्षाच्या या मागणीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत आवश्यक कार्यवाही केली.उपविभागीय अधिकारी शैलेश काळे आणि तहसीलदार पवन पाटील यांच्या तत्परतेने व प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे वाघोदे कुटुंबाला अखेर चार लाख रुपयांची शासकीय आर्थिक मदत मिळाली.गरीब कुटुंबाचा मुख्य आधार अचानक हिरावला गेल्यानंतर संकटकाळात शासनाची मदत मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने वाघोदे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.“संकटाच्या काळात पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून त्यांना शासकीय मदत मिळवून देणे हीच सामाजिक बांधिलकी आहे,” अशी भावना समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद नफीस यांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post