जळगाव जामोद(प्रतिनिधी);
रक्षाबंधनाचा पवित्र सण केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक न राहता निसर्गाशीही आपले जिव्हाळ्याचे नाते जोडणारा ठरावा, या उद्देशाने सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिरात पर्यावरणपूरक रक्षाबंधन उत्साहात व संस्कारमय वातावरणात साजरे करण्यात आले.विद्यालयाच्या मुख्य संयोजिका डॉ. सौ. स्वाती केला यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विनायक उमाळे सर तसेच सहकार विद्या मंदिर, वरवट बकालचे प्राचार्य राजेश लोहिया सर यांची विशेष उपस्थिती लाभली.रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘Rakhi Making Activity’ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने रंगीबेरंगी व आकर्षक राख्या तयार केल्या. विशेष म्हणजे या राख्यांमध्ये विविध बियांचा कल्पक वापर करण्यात आल्याने ‘आजची राखी, उद्याचे झाड’ हा अनोखा पर्यावरणपूरक संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आला.Nursery ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. Nursery, KG-1 आणि KG-2 मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राखीच्या आकारात उभे राहून कार्यक्रमाची आकर्षक सुरुवात केली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगणारी मनोगते, भाषणे तसेच रक्षाबंधनावर आधारित गीतांचे सादरीकरण केले. विशेषतः इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी मनोगतांमधून रक्षाबंधनाचे महत्त्व विशद केले. देशमुख मॅडम यांनी सुंदर सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली.यानंतर पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मॅडम व मनीषा म्हसाळ मॅडम यांनी प्राचार्य विनायक उमाळे सर व प्राचार्य राजेश लोहिया सर यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर विविध वर्गांतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना बांधल्या राख्या.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थिनी व शिक्षिकांनी विद्यालयाच्या परिसरातील झाडांनाही राख्या बांधल्या. माणसांप्रमाणेच झाडांशीही आपले जिव्हाळ्याचे नाते असून त्यांचे संगोपन, संवर्धन व संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा सुंदर संदेश यावेळी देण्यात आला.बियांचा वापर करून तयार केलेल्या राख्यांमधून भविष्यात नव्या रोपांची निर्मिती आणि हिरवाई वाढविण्याची सकारात्मक संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यात आली. त्यामुळे रक्षाबंधनाचा हा उपक्रम प्रेम, बंधुभाव, संस्कार, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुषमा देशमुख, तेजस्विनी पाटील, राजेश राठी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. सर्वांच्या नियोजनबद्ध सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
“राखीचा धागा प्रेमाचा,
बीज असो हिरवाईचे;
नाते जपूया माणसांचे,
आणि संकल्प करूया निसर्गरक्षणाचा!”या संदेशातून विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने नाती जपण्यासोबतच निसर्गाचे रक्षण करण्याचा संकल्प केला.
