मद्यधुंद बोलेरो चालकाची दुचाकीला भीषण धडक; आईसह चिमुकलीचा मृत्यू, ३ वर्षीय समीरची प्रकृती चिंताजनक... लाडनापुर टुनकी जवळील घटना.


 मद्यधुंद बोलेरो चालकाची दुचाकीला भीषण धडक; आईसह चिमुकलीचा मृत्यू, ३ वर्षीय समीरची प्रकृती चिंताजनक... लाडनापुर टुनकी जवळील घटना.

बुलडाणा जिल्हा (प्रतिनिधी);

 रक्षाबंधनाच्या सणासाठी माहेरी जाणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी लाडणापूर दूध डेअरीजवळ घडली. कथित मद्यधुंद बोलेरो चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आईसह तिच्या एक वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघे जखमी झाले असून ३ वर्षीय समीर संजय वास्कले याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.मृतांमध्ये सपना संजय वास्कले (वय २८) आणि त्यांची एक वर्षाची चिमुकली उर्मी ऊर्फ पुर्वी संजय वास्कले यांचा समावेश आहे.भीषण अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने बोलेरो वाहन पेटवून दिले. त्यामुळे काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो चालक हा अकोट–खंडवा रेल्वे लाईनच्या कंत्राटदाराचा खासगी माणूस असल्याचे सांगण्यात येत आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला. त्यामुळे चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जमावाकडून करण्यात आली.या भीषण अपघातात दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने संतप्त नागरिकांनी बोलेरो चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने तसेच जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथील पीएसआय नागेश खाडे व सहकाऱ्यांसह आरसीपी पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.पोलिसांनी संतप्त जमावाशी संवाद साधून परिस्थिती शांत केली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.अपघातातील गंभीर जखमी ३ वर्षीय समीर संजय वास्कले याची प्रकृती चिंताजनक असल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इतर जखमींवरही उपचार सुरू आहेत..रक्षाबंधनाच्या आनंदासाठी माहेरी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन निष्पाप जीवांचा मृत्यू आणि चिमुकल्याची चिंताजनक प्रकृती यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.या प्रकरणी हिरालाल अनारसिंग वास्कले यांच्या फिर्यादीवरून बोलेरो चालक रवी गोखले याच्याविरुद्ध कायम अप क्रमांक २५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५ व ११० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार संदीप काळे करीत आहेत.

Previous Post Next Post