जुन्या वादाचा बदला? तरुणावर धारदार वस्तूने हल्ला; खामगावात उपचार सुरू...


 जुन्या वादाचा बदला? तरुणावर धारदार वस्तूने हल्ला; खामगावात उपचार सुरू...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

जळगाव जामोद शहरातील खेर्डा वेस, सावता नगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर ब्लेडसदृश वस्तूने हल्ला केल्याची घटना शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या हल्ल्यात आकाश अनिल इंगळे हा तरुण जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश अनिल इंगळे (वय २८, रा. खेर्डा वेस, सावता नगर, जळगाव जामोद) हा आपला भाऊ आकाश व मित्रांसोबत खेर्डा वेस येथील वडाच्या झाडाजवळ गप्पा मारत बसला होता. यावेळी आरोपी शेख शफीक शेख गफ्फार (वय अंदाजे ४०, रा. खेर्डा वेस, जळगाव जामोद) तेथे आला.

आरोपीने आकाशला उद्देशून “तूने पिछली बार झगडा क्यू किया था?” असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर आकाशने “जो हो गया, वो हो गया” असे सांगितले. मात्र, त्यानंतर वाद वाढला आणि आरोपीने हातातील ब्लेडसदृश वस्तूने आकाशच्या चेहऱ्यावर वार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.या हल्ल्यात आकाशच्या चेहऱ्यावर जखम झाली.घटनेनंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टसह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे कायमी अप क्रमांक ५५५/२०२६, कलम ११८(१), ३५२ BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे, पोलीस निरीक्षक सचिन बागुल तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करीत आहेत.दरम्यान, या घटनेमुळे खेर्डा वेस परिसरात काही काळ चर्चेला उधाण आले होते. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण व घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जात आहे.

Previous Post Next Post