सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी:
ज्येष्ठ समाजसेवक हिदायत पटेल हत्याकांडातील प्रमुख आरोपी फाझिल आसिफ खान याच्या कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी त्याची अग्रिम जामीन याचिका फेटाळली. त्यामुळे पोलिसांना आरोपीला अटक करून ताब्यात चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अकोट येथे ६ जानेवारी २०२६ रोजी हिदायत पटेल यांच्यावर चाकूहल्ला झाला होता. त्यानंतर ७ जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्राथमिक आरोपी उबैद पटेल याला अटक केली होती.दरम्यान, हिदायत पटेल यांनी मृत्युपूर्वी तीन साक्षीदारांसमोर केलेल्या कथित डायिंग डेक्लरेशनमध्ये काही व्यक्तींची नावे नमूद केली होती. त्यामध्ये फाझिल खान अर्थात फाझिल आसिफ खान याचे नाव असल्याचे न्यायालयीन आदेशात नमूद करण्यात आले.
न्या. एम. एम. नेरळीकर यांच्या खंडपीठाने उपलब्ध रेकॉर्ड आणि तपासातील तथ्यांचा विचार करताना आरोपीचा प्रथमदर्शनी सहभाग दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवले. कथित षडयंत्र, आरोपींमधील संबंध आणि हत्येची पार्श्वभूमी उलगडण्यासाठी कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याचेही न्यायालयाच्या आदेशातून स्पष्ट झाले.तपास यंत्रणेने आरोपींमध्ये घटनेपूर्वी आणि घटनेनंतर टेलिफोनिक संपर्क झाल्याचे न्यायालयास सांगितले. कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि तीन साक्षीदारांच्या जवळपास समान डायिंग डेक्लरेशनचा तपासात महत्त्वाचा आधार घेतला जात आहे.आता पोलिसांकडून आरोपींमधील फोन संपर्क, घटनाक्रमातील हालचाली, संभाव्य भेटीगाठी, कथित षडयंत्राची रूपरेषा आणि डिजिटल पुराव्यांचा सखोल तपास होण्याची शक्यता आहे.अग्रिम जामीन फेटाळण्याचा हा निर्णय अंतिम दोषसिद्धी नसून जामीन अर्जापुरता न्यायालयाचा प्रथमदर्शनी आढावा आहे. मात्र या निर्णयामुळे हत्याकांडाच्या पुढील तपासाला निश्चितच महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
