दुर्गामाता मंदिरातील ९०० ग्रॅम चांदीचा मुकुट गायब; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल..मंदिर परिसरातील CCTV बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिक आक्रमक...


 दुर्गामाता मंदिरातील ९०० ग्रॅम चांदीचा मुकुट गायब; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल..मंदिर परिसरातील CCTV बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिक आक्रमक...

जळगाव जामोद, प्रतिनिधी :

 शहरातील राजा भर्तृहरी नाथ महाराज मंदिराच्या बाजूस असलेल्या दुर्गामाता मंदिरातील देवीच्या डोक्यावरील अंदाजे ९०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या प्रकरणी अंबादास श्यामराव भाकरे यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुर्गामाता मंदिरात अंबादास श्यामराव भाकरे हे नियमितपणे पूजा-अर्चना व देवीची आरती करण्यासाठी जातात. तसेच प्रकाश देशपांडे महाराज हे मंदिरातील पूजा-अर्चना व देखभालीचे काम पाहतात.१४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता अंबादास भाकरे हे मंदिरात गेले असता देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र सायंकाळी सुमारे ५ वाजता रोहित गजानन कल्याणकर यांनी फोन करून मंदिरातील देवीच्या अंगावरील फुलांचे हार उचकटलेले असून देवीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट दिसत नसल्याची माहिती दिली.यानंतर अंबादास भाकरे यांनी रोहित गजानन कल्याणकर तसेच अजय गजानन गवडे यांच्यासमवेत मंदिर परिसर व आजूबाजूच्या भागात मुकुटाचा शोध घेतला. मात्र मुकुट मिळून आला नाही. सदर चांदीचा मुकुट अंदाजे १५ ते २० वर्षे जुना असून त्याचे वजन सुमारे ९०० ग्रॅम असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तक्रारीनुसार मुकुटाची अंदाजे किंमत ४ हजार ८०० रुपये आहे.सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश करून चांदीचा मुकुट चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.दरम्यान, राजा भर्तृहरी नाथ महाराज मंदिर परिसरातील नगर परिषदेकडून बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मंदिरातील चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.दुर्गामाता मंदिराचे अध्यक्ष अंबादास भाकरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी उपाध्यक्ष संजय खेकाडे तसेच नगरसेवक सय्यद नफीस उपस्थित होते.राजा भर्तृहरी परिसरात विविध धार्मिक स्थळे असल्याने भाविक व नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेले CCTV कॅमेरे बंद असल्याने चोरीच्या घटनांचा तपास करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.सीसीटीव्ही यंत्रणेची सखोल तपासणी करून बंद कॅमेरे तातडीने सुरू करावेत आणि मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था कायमस्वरूपी कार्यरत ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Previous Post Next Post