राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
सोमवारी पहाटेच्या सुमारास अमरावती शहर एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने हादरले. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरिन रुग्णालय) नवजात शिशु अतिदक्षता विभागात भीषण आग लागून ३ नवजात बालकांचा गुदमरून करुण अंत झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासकीय यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहेमिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवीन इमारतीत असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे ३:३० ते ४:०० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला आणि पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले.काही मिनिटांतच संपूर्ण NICU कक्षात दाट धूर पसरला. अतिदक्षता विभागात कमी दिवसांची, कमी वजनाची व गंभीर अवस्थेतील बालके उपचाराधीन असल्यामुळे त्यांना तत्काळ सुरक्षित हलवणे मोठे आव्हान बनले होते. धुराची तीव्रता इतकी प्रचंड होती की, श्वसनमार्ग रोखल्या गेल्याने ३ बालकांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.कर्तव्यावर असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत जीवाची पर्वा न करता इतर चिमुकल्यांना सुरक्षीतपणे बाहेर काढले.घटनेनंतर लगेचच बाधित व भाजलेल्या इतर बालकांना तातडीने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलबाह्य विभाग) हलवण्यात आले. सध्या तेथे ४ बालकांवर उपचार सुरू असून, त्यापैकी एका बालकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तीव्र दुःख व उच्चस्तरीय चौकशीचे आदेश.या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.अमरावतीतील घटनेने माझे मन हेलावून गेले आहे. मृत नवजात बालकांना मी व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पालकांना हे अथांग दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो," अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.पालकमंत्र्यांनी या भीषण आगीच्या संपूर्ण चौकशीचे उच्चस्तरीय आदेश दिले आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, यात कोणाचा हलगर्जीपणा आहे का, याची सखोल तपासणी केली जाईल.बाधित बालकांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले असून, शासन व जिल्हा प्रशासन मृत बालकांच्या कुटुंबीियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अमरावतीच्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा आणि उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला असून नागरिक व नातेवाईकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
