हींदु यात्रा मार्गावर डॉ.शेख यांची रूग्ण सेवा..तिनं दशकांपासून करताहेत धारगड यात्रेकरूंची रुग्णसेवा...


 हींदु यात्रा मार्गावर  डॉ.शेख यांची रूग्ण सेवा..तिनं दशकांपासून करताहेत धारगड यात्रेकरूंची रुग्णसेवा...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी..

आजकाल कोणत्याही गोष्टीत हिंदू-मुस्लिम वाद आणण्याच्या काळात सातपुड्याच्या डोंगर कपारीत, दुर्गम भागात धर्माच्या पलीकडे जात एक मुस्लिम डॉक्टर परिवार गेली तीन दशके कावडधारी भाविकांची मनोभावे सेवा देत आहे, या सेवेचे यात्रेकरू मुक्तकंठाने प्रशंसा करीत आहेत. सोशल मीडिया उघडल्याबरोबर दुर्दैवाने तासंतास जातीयवादाची बिजं पेरण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून समाजात सुरू आहे. दिवस निघाला की जातपात, धर्म, पंथ, हिंदू-मुस्लिम, जिहाद, सनातन या सर्व गोष्टींच्या माध्यमातून विष पेरण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे तरुण पिढीचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलला आहे. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत काही माणसं जातीवादी विषाची रोपे उपटण्याचे काम प्रामाणिकपणे करत असतात त्याचच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अकोट येथील शेख परीवार" म्हणावा लागेल. धारगड सारख्या दुर्गम डोंगराळ भागात दिवंगत डॉ. एस.बी. शेख व त्यानंतर त्यांचा मुलगा डॉ. कफील शेख हे धारगड यात्रेकरूंना तब्बल ३४ वर्षांपासून अविरतपणे जातीधर्माच्या

पलीकडे जाऊन कोणतीही अपेक्षा न करता मोफत वैद्यकीय सेवा देत आहेत. ती केवळ वैद्यकीय उपचार सेवा नसून हजारो भाविकांसाठी देवदूत बनून दिलेले जीवनदान आहे. या यात्रेत उंचावर पायी चालल्यामुळे ब्लडप्रेशर, कावड धारकांच्या पायाला जखमा होणे, दुचाकी घसरून अपघात होणे. या सर्व गोष्टींवर ते प्राथमिक उपचार करतात. सध्या या कामासाठी ध्यास लागतो... डॉ.शेख हे धर्माचे बंधन तोडुन निरपेक्ष भावनेने करत असलेल्या निस्वार्थी सेवेचे अनेक शिवभक्ताकडुन कौतुक होत आहे..


वडिलांनी सुरु केलेले हे सेवाकार्य पुढची पिढी सुरु ठेवेल याची आजच्या काळात गॅरंटी नसताना डॉ. कफिल शेख यांनी सुरु ठेवलेले हे सेवाकार्य करण्यासाठी प्रचंड ध्यास लागतो तो कफिल शेख यांच्यात दिसून येतो. अश्या कार्याचे सर्वानी कौतुक केले तर नव्याने सामाजिक, धार्मिक ऐक्याचे पर्वा नक्कीच सुरु होईल अशी प्रतिक्रिया तेल्हारा पंचायत समितीचे माजी सभापती गोपाल कोल्हे यांनी व्यक्त केली.

_____________________________

हे माझे कर्तव्य आहे

माझे वडील मानव सेवेवर नितांत भरवसा ठेवणारे होते त्यांनी त्याच भावनेतून कावडधारी भाविकांच्या सेवेला सुरुवात केली, मला सुद्धा त्यांचे कार्य पुढे सुरु ठेवले पाहिजे असे वाटले, मी फार मोठे काम करतो असे नाही हे माझे कर्तव्य आहे, मला समोर येणारा प्रत्येक जण फक्त रुग्ण वाटतो, त्यात जात, धर्म अजिबात दिसत नाही अशी मानवतावादी प्रतिक्रिया डॉ. कफिल शेख यांनी व्यक्त केली

Previous Post Next Post