जळगाव जामोद(प्रतिनिधी);
तहसील कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये दिव्यांग नागरिकांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेला रॅम्प उपलब्ध नसल्याने दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी सुलभ प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना, तहसील कार्यालयाच्या इमारतीत रॅम्पची सुविधा का करण्यात आली नाही? असा संतप्त सवाल दिव्यांग बांधवांनी उपस्थित केला आहे.तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना कार्यालय असल्याने दररोज मोठ्या संख्येने वृद्ध, दिव्यांग आणि गरजू नागरिक विविध कामांसाठी येत असतात. मात्र कार्यालयात जाण्यासाठी चढ-उतार करताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिव्यांग बांधवांचे म्हणणे आहे.त्यामुळे दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी सुलभ आणि सुरक्षित मार्ग म्हणून तातडीने रॅम्प बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.या मागणीसंदर्भात दिव्यांग बांधवांनी यापूर्वी १५ जुलै २०२६ रोजी लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र निवेदन देऊन जवळपास दोन महिने उलटत आले तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार तोंडी तसेच लेखी स्वरूपात मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने दिव्यांग बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.प्रशासनाकडून मागणीची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ ८ सप्टेंबर २०२६ रोजी रॅम्पच्या ठिकाणी ‘बेशरम’चे झाड लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात येईल, असा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असेही पुनश्च सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘दिव्यांगांसाठी सुविधा देण्याचे शासनाचे धोरण कागदावरच राहणार का?’ असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन तहसील कार्यालयात रॅम्पची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे.निवेदन देतेवेळी नारायण महाले, तेजराव पाटील, सरदार आवासे, अविनाश दिगंबर, श्रीरंग बहादुरे, नितीन कोकाटे, पुंडलिक तायडे, संतोष पारस्कर, सुनील आगाशे, रती राठी, रमाकांत चिम, राहुल चंदनकर यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
