महावितरणच्या मनमानीविरोधात शेतकरी आक्रमक!अक्षय पाटील यांचा आंदोलनाचा इशारा...


 महावितरणच्या मनमानीविरोधात शेतकरी आक्रमक!अक्षय पाटील यांचा आंदोलनाचा इशारा...

जळगाव जामोद (प्रतिनिधी);

पावसाने तब्बल दीड महिन्याचा खंड दिल्याने खरीप पिके सुकण्याच्या मार्गावर असताना, उपलब्ध सिंचन साधनांच्या माध्यमातून पिके वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना आता महावितरणच्या अनियमित कारभाराचा सामना करावा लागत आहे. वारंवार बदलणारे वीजपुरवठ्याचे वेळापत्रक, अचानक खंडित होणारा वीजपुरवठा, ठिकठिकाणी पडलेले विद्युत पोल आणि ओव्हरलोड झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या समस्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.या विविध समस्यांविरोधात बोराळा, उटी निंभोरा बु., भेंडवळ बु.,हिंगणा मानकर आणि खांडवी येथील शेतकरी एकत्रितपणे आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चौबारावाला यांची भेट घेत विविध समस्यांचा पाढाच वाचला.यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणकडून वारंवार वीजपुरवठ्याच्या वेळेत होणारे बदल तातडीने थांबवावेत,नियमित व सुरळीत वीजपुरवठा करावा,वादळ-पावसामुळे पडलेले विद्युत पोल तातडीने उभे करून दुरुस्ती करावी तसेच ज्या भागातील ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात लोड आहे, त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.दरम्यान, काही ठिकाणी तातडीने मार्गी लागणारी कामेही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रलंबित राहत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यामुळे चर्चेदरम्यान अक्षय पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली.अक्षय पाटील यांनी यावेळी बुलढाणा येथील अधीक्षक अभियंत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या महावितरणच्या विविध समस्यांची माहिती दिली.शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत तसेच शेतकऱ्यांशी मनमानी अथवा अरेरावीची वर्तणूक करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.“शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.महावितरणने शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा अक्षय पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान दिला.पावसाअभावी आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावाव्यात,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.यावेळी बोराळा, उटी निंभोरा बु.,भेंडवळ बु., हिंगणा मानकर, खांडवी आदी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous Post Next Post