बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी):
गरिबांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी घरकुल योजनेतील बांधकामाची प्रत्यक्ष स्थिती पाहून लाभार्थ्यांना तात्काळ निधी अदा करा. जिल्ह्यातील घरकुल आणि नरेगा अंतर्गत कामे ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करा. कामात कुचराई अथवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असे खडे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले.बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ९ सप्टेंबर रोजी केंद्रीय पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी दिशा समितीची बैठक ना. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल, नरेगा, पाणीपुरवठा, पीक नुकसान, ई-पीक पाहणी, ई-केवायसी, वीजपुरवठा तसेच रेल्वे प्रकल्पांसह विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
घरकुल लाभार्थ्यांना कार्यालयांच्या फेऱ्या नकोत!
घरकुल योजनेतील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे ना. जाधव यांनी स्पष्ट केले. लाभार्थ्याने घरकुलाचे जेवढे बांधकाम पूर्ण केले आहे, त्यानुसार त्याला तातडीने निधी वितरित करावा. गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून लाभार्थ्यांना सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.घरकुल व नरेगा योजनांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आणून देत, केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित न करता संबंधित गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांचीही जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर बैठक घेऊन प्रभावी नियोजन करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांना करण्यात आली.
पाणीटंचाईच्या संकटासाठी आतापासूनच नियोजन करा!
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आराखडे तातडीने तयार करावेत, असे निर्देश ना. जाधव यांनी दिले.‘अमृत’ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. कामात दिरंगाई अथवा कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.‘जल जीवन मिशन’अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सुरू असलेल्या कामांना गती देतानाच कामाची गुणवत्ता अबाधित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
पीक नुकसानीची पाहणी तातडीने करा!
पीक नुकसानीची पाहणी तातडीने करून आवश्यक कार्यवाही करावी. शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी, तसेच ई-केवायसीबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, असे ना. जाधव यांनी सांगितले.शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देतानाच कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही त्यांनी बजावले.पावसात झालेल्या विलंबामुळे पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक वीज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी पार पाडावी. वीज उपलब्धतेअभावी पिकांना पाण्याची कमतरता भासता कामा नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पांना गती देतानाच ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचा किंवा विशिष्ट प्रकारचा मोटार पंप घेण्याची सक्ती करू नये, असेही ना. जाधव यांनी स्पष्ट केले.
जालना-खामगाव रेल्वे मार्गाची रखडलेली कामे मार्गी लावा!
पीएम गतीशक्ती अंतर्गत जिल्ह्यातील जालना-खामगाव नवीन रेल्वे मार्गाशी संबंधित भूसंपादनासह इतर सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश ना. जाधव यांनी दिले. संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून विकासकामांना गती देण्याचे आवाहन त्यांनी केले.केंद्र शासनाच्या विविध योजनांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केले.
