निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी घेतला समाजसेवेचा धडा!त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयाची सालाईबन येथे क्षेत्रभेट; राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम...


 निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी घेतला समाजसेवेचा धडा!त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयाची सालाईबन येथे क्षेत्रभेट; राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

समता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आसलगाव बाजार येथील राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने निसर्गरम्य सालाईबन येथे शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धन, समाजसेवा आणि माणुसकीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तरुणाई फाऊंडेशन व सालाईबनचे संयोजक मनजीत सिंग म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समाज घडविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. दिनदुबळे, अनाथ व आदिवासी समाजघटकांमध्ये जाऊन समाजसेवेचे व्रत अंगीकारत विद्यार्थ्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.प्राचार्य विद्या काटले यांनी निसर्गसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना, माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा निसर्ग देतो.त्यामुळे निसर्गाचे ऋण फेडण्याची जबाबदारीही आपलीच असून, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला.सालाईबन परिसरातील समृद्ध निसर्गसंपदेची विद्यार्थ्यांनी यावेळी प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरातील विविध वनौषधी वृक्ष, पक्ष्यांच्या विविध प्रजाती, फुलपाखरांसाठी विकसित केलेली बटरफ्लाय गार्डन,‘माणुसकी सांभाळणारी कुटी’ तसेच शांतीस्थळ यांची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनजीत सिंग यांनी कष्ट,श्रमदान आणि सेवाभावातून सालाईबन परिसराचे नंदनवनात रूपांतर केले आहे. या कार्याची माहितीही विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.या क्षेत्रभेटीत राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका तसेच प्रा. सुप्रिया इंगळे, प्रा. रवींद्र निमकर्डे, प्रा. योगेश वारुकार यांची उपस्थिती होती.क्षेत्रभेटीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. शरद गावंडे यांनी पुढाकार घेतला.

Previous Post Next Post