महाराष्ट्र आट्यापाट्या महामंडळाच्या कार्यकारिणीची सभा संपन्न.आगामी २०२६-२७ क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची रूपरेषा निश्चित...


 महाराष्ट्र आट्यापाट्या महामंडळाच्या कार्यकारिणीची सभा संपन्न.आगामी २०२६-२७ क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची रूपरेषा निश्चित...

शेगाव/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

महाराष्ट्र आट्यापाट्या महामंडळ, नागपूरच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा शेगाव येथील शासकीय विश्राम भवनमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जयदीप सोनखासकर होते, तर सचिव अमरकांत चकोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणीतील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.सभेच्या प्रारंभी मागील सभेच्या अहवालाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर महामंडळाच्या आगामी कामकाजाचा आढावा घेत २०२६-२७ या क्रीडा वर्षातील आट्यापाट्या टूर्नामेंट व विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्पर्धांचे नियोजन, आयोजनाची रूपरेषा, खेळाडूंचा सहभाग, विविध स्तरांवर स्पर्धांचे आयोजन तसेच स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन याबाबत पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली.


आट्यापाट्या हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक व सांघिक खेळ असून, या खेळाला अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे, ग्रामीण भागातील तसेच नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध व्हावी आणि राज्यातील आट्यापाट्या खेळाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत व्हावी, यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली.२०२६-२७ मध्ये होणाऱ्या आगामी स्पर्धा अधिक शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि खेळाडूंसाठी उपयुक्त ठराव्यात, यासाठी आवश्यक तयारी करण्यावर भर देण्यात आला. स्पर्धांच्या माध्यमातून राज्यभरातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच आट्यापाट्या खेळाचा प्रसार आणि विकास करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष श्रीधर  ढाकुलकर, सहसचिव धर्मेंद्र काळे, अमर काटे, शरद गवार, अमर खराटे, सतीश इखार, अनिल माकडे,मधुकर क्षीरसागर सर, श्याम देशमुख यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.सभेअंती आगामी २०२६-२७ क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला. शेगाव येथे झालेल्या या बैठकीमुळे महाराष्ट्रातील आट्यापाट्या खेळाच्या आगामी वाटचालीला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.      

 ----- “आट्यापाट्या हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक आणि सांघिक खेळ आहे. या खेळाला राज्यभर अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे, ग्रामीण भागातील तसेच नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, यासाठी महामंडळाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आगामी २०२६-२७ क्रीडा वर्षात अधिकाधिक स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी एकत्रितपणे काम केल्यास आट्यापाट्या खेळाला निश्चितच मोठी उंची मिळेल.”

- अमर खराटे सहसचिव ---

Previous Post Next Post