शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले कृषिमंत्री; पिंप्राळा येथे पीक परिस्थितीची केली पाहणी.तातडीने अचूक पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू – ना. दत्तात्रय भरणे...


 शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले कृषिमंत्री; पिंप्राळा येथे पीक परिस्थितीची केली पाहणी.तातडीने अचूक पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू – ना. दत्तात्रय भरणे...

सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी..

एल निनोच्या प्रभावामुळे पावसात पडलेल्या खंडामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी तातडीने व अचूक पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असून, भरीव मदत करण्यात येईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.पावसातील खंड, अनियमित पर्जन्यमान आणि त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत कृषिमंत्री भरणे यांनी आज खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंडामुळे झालेला परिणाम तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.नुकसानग्रस्त भागातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा पंचनामा अचूकपणे होईल, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषिमंत्री भरणे यांनी दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, निश्चितपणे भरीव मदत करण्यात येईल. यंत्रणांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

“आम्ही सर्वजण शेतकऱ्यांचीच मुले आहोत. त्यामुळे बळीराजाचे दुःख आणि त्याचे नुकसान आम्ही समजू शकतो. संकटाच्या या काळात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि थेट मदत पोहोचविण्यासाठी शासन खंबीरपणे कार्यरत आहे,” अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली.पीक नुकसानीसोबतच पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा आणि वीजपुरवठा या मूलभूत बाबींवर प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा सूचना कृषिमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.या पाहणीचा सविस्तर अहवाल तयार करून मुख्यमंत्री यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास ना. भरणे यांनी व्यक्त केला.या पाहणी दौऱ्यादरम्यान कामगार मंत्री आकाश फुंडकर, कृषी आयुक्त सुरज मांडरे, जिल्हा अधीक्षक  कृषी  अधिकारी संतोष डांबरे , उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार सुनील पाटील तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post