शेतकऱ्यांना रात्रीच्या वीज पुरवठ्याच्या ‘धोक्या’तून मुक्त करा; दिवसा अखंडित वीज द्या! निवेदनाद्वारे मागणी...


शेतकऱ्यांना रात्रीच्या वीज पुरवठ्याच्या ‘धोक्या’तून मुक्त करा; दिवसा अखंडित वीज द्या! निवेदनाद्वारे मागणी...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

मागील ३० ते ३५ दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, महावितरणकडून रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जामोद, वडशिंगी व खेडी सर्कलमधील शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने हे निवेदन ४ सप्टेंबर रोजी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद केल्यानुसार, मागील काही दिवसांपासून परिसरात  पाऊस न झाल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. सध्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असून उरलेली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेतजमिनी व पिकांचे यापूर्वीच मोठे नुकसान झाले असून ते आर्थिक तसेच मानसिक संकटाचा सामना करीत आहेत.मे महिन्यापासून शेतकऱ्यांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरळीत वीजपुरवठा होत होता.महावितरणने वेळापत्रकात अचानक बदल करून रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा सुरू केला आहे,असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात साप,विंचू तसेच इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढला असून अंधारात शेतात जाणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.जामोद, वडशिंगी व खेडी सर्कलमधील सर्व गावांचा रात्रीचा वीजपुरवठा तत्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी केली आहे.यामध्ये पिंपळगाव,आसलगाव व परिसरातील इतर गावांनाही सुरळीत दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय न घेतल्यास परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील, वर्षाताई वाघ, विश्वासराव भालेराव, प्रमोद सपकाळ, इरफान खान, रामेश्वर मानकर, दत्ता डिवरे, पंजाबराव वाघ, आशिष वायझोडे, नगरसेवक सिद्धार्थ हेलोडे, शत्रुघ्न कोकाटे, समाधान गिरे, विलास सोळंके, राजू देशमुख, शंकर अढाव, श्रीकांत मानकर अतुल जाणे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post