महसूल पथकावरील जीवघेण्या हल्ल्यातील फरार आरोपी हर्षल मनोहर अंभोरे छत्रपती संभाजीनगरातून जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई...


 महसूल पथकावरील जीवघेण्या हल्ल्यातील फरार आरोपी हर्षल मनोहर अंभोरे छत्रपती संभाजीनगरातून जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई...

बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी);

महसूल पथकावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला बुलढाणा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. हर्षल मनोहर अंभोरे (वय २३, रा. एकलारा, ता. चिखली) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.४५ वाजता ग्राम अंढेरा येथे तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या आदेशाने महसूल पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करीत होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाचा टिप्पर विनापरवाना व अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना पथकाच्या निदर्शनास आला.महसूल कर्मचाऱ्यांनी टिप्पर थांबवून त्याची तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने टिप्पर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने टिप्पर त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.या घटनेत महसूल कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. तसेच आरोपीने टिप्पर पळवून नेण्यास मदत केल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस ठाणे अंढेरा येथे अप.क्र. २७०/२०२६ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर आरोपी हर्षल मनोहर अंभोरे फरार झाला होता.फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिस पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे कारवाई करत हर्षल मनोहर अंभोरे याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पोलीस ठाणे अंढेरा यांच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. दिनेश धुमे करीत आहेत.महसूल पथकावरील या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी, तलाठी तसेच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी निषेध नोंदवत कामबंद आंदोलन केले होते. आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणातील फरार आरोपीला अटक झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड तसेच अपर पोलीस अधीक्षक खामगाव पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोनि. हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. शरदचंद्र गिरी, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, पुरुषोत्तम आघाव, पो.कॉ. अमोल अंभोरे, मपोकॉ. पूजा जाधव, चालक पो.कॉ. विलास भोसले, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोहेकॉ. राजू आडवे, पोहेकॉ. पवन मखमले, पो.कॉ. ऋषीकेश खंडेराव तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा येथील कैलास ठोंबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post Next Post