जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध!संवेदनशील मार्गांवर दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरण्यास बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई...


 जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध!संवेदनशील मार्गांवर दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरण्यास बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी शैलेश काळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (३) अन्वये कडक आदेश जारी केला आहे. हा आदेश २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत अथवा विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत लागू राहणार आहे.पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या अहवालात मागील काळातील घटनांचा तसेच शहरातील संवेदनशील परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला होता.गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दी वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये,यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे.

🔴 या भागांमध्ये विशेष निर्बंध--

संत रूपलाल नगर ते वायलीवेस, ताटीपुराकडे जाणारा रोड, चौभारा गल्ली, तसेच तलावपुरा येथील खालीकबापू देशमुख यांच्या घरापासून प्रगटेश्वर शाळा–न्हावीपुराकडे जाणारा रोड व मंजूर यांच्या घराकडे जाणारा रोड या संवेदनशील परिसरात दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रितपणे फिरू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलीस अहवालानुसार,विसर्जन मार्गातील काही भाग मिश्र वस्तीमधून जात असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोणत्याही कारणावरून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.उपविभागीय दंडाधिकारी शैलेश काळे यांनी स्पष्ट केले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल.विसर्जनाचा कालावधी संपल्यानंतर हा आदेश आपोआप समाप्त होणार आहे.तर गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post