जळगाव जामोद(प्रतिनिधी);
सातपुडा गणेशोत्सव व राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने २४ सप्टेंबर २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील तब्बल ७८ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. रक्तदानाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ‘सेवा हीच सामाजिक बांधिलकी’ या भावनेचा प्रत्यय दिला. स्वयंसेवकांनी केवळ रक्तदानात सहभाग घेतला नाही, तर शिबिराच्या आयोजनातही सक्रिय योगदान देत रक्तदानाबाबत जनजागृती केली.रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि मानवतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
