बालविकासाचा जागर; ‘नवचेतना’ व ‘आधारशिला’तून जामोद येथे वेलकम मेळावा उत्साहात..!


 बालविकासाचा जागर; ‘नवचेतना’ व ‘आधारशिला’तून जामोद येथे वेलकम मेळावा उत्साहात..!

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, जळगाव जामोद अंतर्गत ‘नवचेतना’ व ‘आधारशिला’ या उपक्रमांच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास तसेच पालकांमध्ये आरोग्य, पोषण आणि पूर्वशालेय शिक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जामोद येथे वेलकम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. २ सप्टेंबर २०२६ रोजी जामोद येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक १४ या डेमो अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी क्रमांक ३, ४, ५, १२, १३ व १४ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षिका सौ. रेखा जयदेव वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जामोद ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. गंगुबाई पुंडलिकराव दामधर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच, पर्यवेक्षिका तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप डाबरे, डॉ. खर्चे मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्र जामोदचे वैद्यकीय अधिकारी एम.ओ. ऐनकर, एम.पी.डब्ल्यू. वानखडे सर, रायपुरे सर, ग्रामपंचायत सदस्य शिवनारायण धुर्डे यांच्यासह अंगणवाडी विभागातील अधिकारी-कर्मचारी, सेविका, मदतनीस, बालके आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्यात बालकांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पूरक पोषण आहाराचे प्रात्यक्षिक, बेडूक उड्या, दोरीवरील उड्या, हाताचे ठसे आदी उपक्रमांचा समावेश होता. विशेष म्हणजे बालकांसोबत पालकांनीही या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने मेळाव्याला आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरण लाभले.यावेळी पर्यवेक्षिका रेखा वानखडे यांनी माता-पालकांना बालकांच्या योग्य आहारासोबतच आरोग्य, स्वच्छता आणि पूर्वशालेय शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत नियमितपणे अंगणवाडीत पाठविणे आवश्यक असल्याचे त्यांनी मार्गदर्शनातून स्पष्ट केले.कार्यक्रमाचे संचालन मिश्रा मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुवर्णा भगत यांनी केले.मेळावा यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका सुमन ढगे,सुवर्णा भगत, कांता सपकाळ,अनिता कोथळकार, ममता बारिगे, विमल रंदळे तसेच मदतनीस सुमित्रा कपले, शांता रंदळे, सरला लोणे, रेखा बोडखे व ईदु पदमने यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post Next Post