दुष्काळ जाहीर झाला; आता मदतीसाठी ठाकरे गटाचा एल्गार! ३० सप्टेंबरला खामगाव उपविभागीय कार्यालयावर धडकणार भव्य शेतकरी मोर्चा; कापूस ₹१० हजार, सोयाबीन ₹८ हजार भावाची मागणी...


 दुष्काळ जाहीर झाला; आता मदतीसाठी ठाकरे गटाचा एल्गार!

३० सप्टेंबरला खामगाव उपविभागीय कार्यालयावर धडकणार भव्य शेतकरी मोर्चा; कापूस ₹१० हजार, सोयाबीन ₹८ हजार भावाची मागणी...

जळगाव जामोद (प्रतिनिधी): 

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतर आता दुष्काळी मदतीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केली आहे.उबाठा गटासह विविध विरोधी पक्ष आणि संघटनांनी बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी निवेदने, मोर्चे आणि आंदोलने केली होती.अखेर शासनाने दखल घेत जिल्ह्यातील संपूर्ण १३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. मात्र, केवळ दुष्काळ जाहीर करून न थांबता शेतकऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कापसाला प्रतिक्विंटल १० हजार रुपये, तर सोयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार रुपये भाव देण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी, पीकविमा तातडीने अदा करणे, शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा वीजपुरवठा करणे आणि प्रीपेड वीज मीटर बसवू नयेत, अशा मागण्याही मांडण्यात येणार आहेत.

याशिवाय बंद झालेले ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे पुन्हा सुरू करावेत, कोरड्या दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत द्यावी तसेच शालेय विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करावी, या मागण्यांचाही समावेश आहे.शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा देण्यात आला आहे. ३० सप्टेंबरच्या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केले आहे.

Previous Post Next Post