आदेशाला केराची टोपली; DJचा दणदणाट सुरूच!गणेश विसर्जनात बंदी झुगारून डीजे वाजवणाऱ्यांवर पोलिसांचा कडक प्रहार; चौघांविरुद्ध गुन्हे दाखल...


 आदेशाला केराची टोपली; DJचा दणदणाट सुरूच!गणेश विसर्जनात बंदी झुगारून डीजे वाजवणाऱ्यांवर पोलिसांचा कडक प्रहार; चौघांविरुद्ध गुन्हे दाखल...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

 जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश, पोलिसांची पूर्वसूचना आणि तरीही गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट! प्रतिबंधित असतानाही डीजे वाजविल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी अखेर चार जणांवर थेट गुन्हे दाखल करून धडक कारवाई केली आहे. या कारवाईने विसर्जन मिरवणुकीतील नियमभंग करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्यास जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी आदेश काढून प्रतिबंध केला होता.संबंधितांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 168 अन्वये नोटीस देऊन आदेशाची माहितीही देण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या नोंदीनुसार आदेशाची कल्पना असूनही डीजेचा वापर करण्यात आला.दि. 25 आणि 26 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद शहरासह परिसरात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत चार वाहनांवर बँडसह डीजे वाजविल्याची प्रकरणे पोलिसांच्या निदर्शनास आली.

याप्रकरणी—अतुल पांडुरंग गोरे (42), रा. सटाणा, जि. नाशिक — वाहन क्र. MH 41 BX 0027,शिवनारायण विठ्ठल हरणे (51), रा. सोनवद, ता. धरणगाव, जि. जळगाव — वाहन क्र. MH 04 HS 1458, मयुर आण्णा कदम (32), रा. कुकाणे, ता. मालेगाव, जि. नाशिक — वाहन क्र. MH 13 DQ 8073,आसाराम लकडू पाटील (41), रा. शिरसमनी, ता. पारोळा, जि. जळगाव — वाहन क्र. MH 48 CB 3175

यांच्याविरुद्ध कलम 223 बीएनएस 2023 अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विसर्जनाचा उत्साह असला तरी प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडल्यास कारवाई होणारच, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. 'आदेश कागदावर आणि डीजे रस्त्यावर' अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांविरोधात थेट कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे.या प्रकरणांचा पुढील तपास  ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नागेश मोहोड,पोहेकॉ इरफान शेख, मपोहेकॉ दिपमाला वानखडे आणि पोहेकॉ संजय वेरुळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.जळगाव जामोद पोलिसांच्या या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीतील नियमभंग करणाऱ्यांना आता 'डीजेचा दणदणाट' नव्हे, तर कायद्याचा दणका अनुभवावा लागणार असल्याचे चित्र आहे.

Previous Post Next Post