जळगाव जामोद(प्रतिनिधी);
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रशासन, अध्ययन-अध्यापन तसेच विविध जबाबदाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थिनी कुमारी पल्लवी माकोडे हिने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.स्वयंशासन दिनाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी प्राचार्य, अधीक्षक, लिपिक, शिपाई तसेच प्राध्यापकांच्या भूमिका पार पाडत दिवसभर महाविद्यालयाचे कामकाज अनुभवले. कला व वाणिज्य शाखेतील सुमारे ३५ ते ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांचे अध्यापनही प्रभावीपणे केले.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते शारीरिक शिक्षणाचे प्रात्यक्षिक.कला शाखेचा विद्यार्थी अभिषेक धुंदाळे याने विद्यार्थ्यांकडून कवायत करून घेत शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून दिले.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपापल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या. कार्यक्रमाच्या समारोपावेळी पल्लवी माकोडे, स्नेहल भोपळे, गौरव अर्दळे, प्राजक्ता तलवारे आणि आचल गिऱ्हे यांनी मनोगत व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी घुळे यांनी केले.महाविद्यालयाच्या सांस्कृतिक मंडळातर्फे प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
