बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी आयुष, आरोग्य, कौशल्य विकास आणि विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.पावसाच्या खंडामुळे राज्यातील अनेक भागांतील खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांबाबत घेतलेल्या निर्णयाचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी स्वागत केले. बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यांचाही दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत समावेश केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व मदतीचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वतंत्र आयुष मंत्रालय व आयुष विद्यापीठाच्या मागणीवर चर्चा..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीत महाराष्ट्रात आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या उपचारपद्धतींच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील आयुष शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र आयुष विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालिका आयुक्तांना आवश्यक निर्देश देण्याबाबतही चर्चा झाली.केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यामध्ये ठाणे येथे २०० खाटांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रुग्णालय उभारणे, सातारा जिल्ह्यातील मौजे दरेगाव येथे केंद्रीय योग व निसर्गोपचार संशोधन संस्था स्थापन करणे तसेच राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणे, या प्रस्तावांचा समावेश होता. याशिवाय ठाणे येथे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे तसेच राष्ट्रीय सिद्ध संस्थेचे उपकेंद्र स्थापन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.राज्यातील ‘३०० कोटी वृक्ष लागवड’ उपक्रमात औषधी वनस्पतींच्या लागवडीचा समावेश करण्याची विनंती करण्यात आली. तसेच NAFEDच्या माध्यमातून राज्यात जनऔषधी केंद्रे सुरू करून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आली.या सर्व प्रस्तावांना गती देण्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर आवश्यक सहकार्य व पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्य, आयुष, कौशल्य विकास आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.

