जळगाव जामोद (प्रतिनिधी);
गणेशोत्सव म्हटला की भक्ती, उत्साह आणि विविध धार्मिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, या उत्सवाला शैक्षणिक उपक्रमाची जोड देत जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलने ‘२१ गणिती दुर्वा’ हा अनोखा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना गणिताचा नियमित सराव करण्यासोबतच बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि संख्याज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.गणपती बाप्पाला २१ दुर्वा प्रिय असल्याने त्यांना २१ दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. याच संकल्पनेवर आधारित गणपती स्थापना ते विसर्जनापर्यंत दररोज विद्यार्थ्यांना २१ गणिते व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून घरच्या अभ्यासासाठी दिली जात आहेत. वर्ग ६ ते १० मधील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वर्गनिहाय अभ्यासक्रमासोबतच बुद्धिमत्ता व तर्कशक्तीवर आधारित प्रश्नांचा यात समावेश करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांचे पायाभूत संख्याज्ञान व गणितीय साक्षरता दृढ व्हावी, गणिताची भीती दूर होऊन विषयाची आवड निर्माण व्हावी आणि नियमित सरावाची सवय लागावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
गणेश विसर्जनानंतर या उपक्रमावर आधारित विशेष परीक्षा घेण्यात येणार असून, प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विठ्ठल राऊत यांच्या वतीने शिल्ड देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.गणेशोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडून ठेवणाऱ्या या उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले असून, सहाय्यक शिक्षक अनिल अभिमन्यू भगत यांच्या अभिनव संकल्पनेचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे.हा उपक्रम मुख्याध्यापक प्रेमसिंग राठोड यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक शिक्षक अनिल भगत यांच्या मार्गदर्शनात तसेच शिक्षक सुरेश भोपळे आणि सुचिता जैन यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. उत्सवाच्या आनंदासोबतच शिक्षणाची गोडी निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहे.
