112 वर खोटी माहिती देत ‘मर्डर’ची अफवा; जळगाव जामोद पोलिसांची धडक कारवाई!हॉटेलजवळ महिलेचा खून झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा; ठाणेदार सचिन बागुल यांचा कडक इशारा...


 
112 वर खोटी माहिती देत ‘मर्डर’ची अफवा; जळगाव जामोद पोलिसांची धडक कारवाई!हॉटेलजवळ महिलेचा खून झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा; ठाणेदार सचिन बागुल यांचा कडक इशारा...

जळगाव जामोद (प्रतिनिधी) :

पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी कारवाई केली आहे. हॉटेलजवळ एका महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र प्रत्यक्ष पाहणी व चौकशीत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांच्या लेखी अहवालानुसार, दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.45 वाजता 112 क्रमांकावरून CFS 40317018 या कॉलद्वारे हॉटेलजवळ एका महिलेचा मर्डर झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कॉल करणाऱ्या सुनील सखाराम डावर (वय 25, रा. निमखेडी, ता. जळगाव जामोद) याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद येत होता.यानंतर पोलिसांनी परिसरात चौकशी करून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला. त्याची पत्नी ममता सुनील डावर हिच्याकडे चौकशी केली असता, आपण फोन केला नसून आपल्या पतीनेच फोन केल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी तसेच आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता खून झाल्याचे कोणतेही चिन्ह आढळले नाही.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अय्यूब शेख गालिब शेख यांच्या फिर्यादीवरून सुनील सखाराम डावर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 351(4) नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत ठाणेदार सचिन बागुल, डी.वाय.ओ. अधिकारी पोहेकॉ बावस्कर, सचिन राजपुत,तसेच चालक पोहेकॉ सचिन शेळके, पोलीस कॉन्स्टेबल अयुब शेख,रवी कोल्हे, मधुकर गाढे यांनी सहभाग घेतला.

--ठाणेदार सचिन बागुल यांचा कडक इशारा--

“पोलीस हेल्पलाईन 112 वर खोटी, अफवा पसरवणारी किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये. अशा प्रकारामुळे पोलीस यंत्रणेचा वेळ व मनुष्यबळ विनाकारण खर्ची पडते. खोटी माहिती देणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई केली जाईल,” असा प्रशासनाच्या वतीने ठाणेदार सचिन बागुल यांनी इशारा दिला आहे.

खबरदारी घ्या, अफवा पसरवू नका; 112 चा वापर केवळ खरी व आपत्कालीन माहिती देण्यासाठीच करा!

Previous Post Next Post