जळगाव जामोद(प्रतिनिधी);
पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँक शाखेत विविध गावांतील शेतकऱ्यांची खाती असून पीक कर्जासाठी मोठ्या संख्येने शेतकरी बँकेशी संबंधित आहेत. मात्र, सध्या शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत असताना पीक कर्ज वाटपासाठी बँकेकडून लावण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या निकषांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.विशेषतः सामाईक सातबाऱ्यावर असलेल्या क्षेत्रफळाच्या आधारे पीक कर्ज देताना वेगवेगळे निकष लावले जात असल्याने काही शेतकरी कर्जापासून वंचित राहत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर 30 सप्टेंबर 2026 रोजी अक्षय पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत सेंट्रल बँक शाखेत धाव घेतली. यावेळी त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. तसेच या प्रश्नासंदर्भात जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली.दरम्यान, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण करणारे निकष बदलून योग्य पद्धतीने कर्जवाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. बँकेने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अक्षय पाटील यांनी दिला.या प्रकारामुळे पिंपळगाव काळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, बँक प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
