ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी कायद्याची जाण; आसलगावात मार्गदर्शन शिबिर उत्साहात...


 ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी कायद्याची जाण; आसलगावात मार्गदर्शन शिबिर उत्साहात...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती, जळगाव जामोद तथा तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबर रोजी आसलगाव येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, आसलगाव येथे सकाळी १० वाजता हे शिबिर पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विस्तार अधिकारी तथा ग्रामपंचायत आसलगावच्या प्रशासक कु. शुभांगी राठोड होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. आनंद जोशी उपस्थित होते. यावेळी ॲड. आनंद जोशी व ॲड. शिरीष मारोडे यांनी आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायदा २००७ तसेच पालक अधिनियम २०१० याबाबत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना सविस्तर कायदेविषयक मार्गदर्शन केले.ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, पालकांच्या पालनपोषणाची कायदेशीर जबाबदारी, उपलब्ध कायदेशीर उपाय तसेच शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विधी सेवा याबाबत यावेळी माहिती देण्यात आली. जळगाव जामोद वकील संघाचे सदस्य ॲड. ए. आर. मानकर यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी जी. एस. गिटे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वकील संघाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारीवृंद तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Previous Post Next Post