ध्येय निश्चित करा, सकारात्मक संगत ठेवा आणि यशाकडे वाटचाल करा!”निवृत्त डीवायएसपी कैलास तानकर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन; प्रेरणागीतांनी रंगला कार्यक्रम....


 ध्येय निश्चित करा, सकारात्मक संगत ठेवा आणि यशाकडे वाटचाल करा!”निवृत्त डीवायएसपी कैलास तानकर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन; प्रेरणागीतांनी रंगला कार्यक्रम....

जळगाव जामोद (प्रतिनिधी) :

बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे येथे बी. एस. पटेल गुरुजी उपाख्य भाऊसाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांसाठी निवृत्त डीवायएसपी कैलास तानकर यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. जीवनात यश संपादन करण्यासाठी ध्येय निश्चिती, सकारात्मक विचार आणि योग्य संगत यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना प्रभावीपणे पटवून दिले.कार्यक्रमाची सुरुवात बी. एस. पटेल गुरुजी, मातोश्री हज्जन जैतूनबी आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी कैलास तानकर यांनी गुरु, ध्येय, प्रोग्रामिंग, नकारात्मकता आणि संगतगुण या विविध विषयांवर सखोल विवेचन केले. विद्यार्थ्यांनी जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि भवितव्याचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.तानकर यांच्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीतील मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, आपल्या भाषणादरम्यान त्यांनी विविध प्रेरणादायी हिंदी चित्रपटांतील गीते स्वतः गायल्याने वातावरणात उत्साह निर्माण झाला. त्यांच्या गीतांमधूनही त्यांनी विद्यार्थ्यांना संघर्ष, जिद्द, आत्मविश्वास आणि यशाचा संदेश दिला.या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीमजी पटेल साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एम. बी. इंगळे, हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित तडवी, हज्जन जैतूनबी बापूमिया पटेल डे कॉलेजचे प्राचार्य मोहम्मद शोएब यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. किशोर गवई यांनी केले. विद्यार्थ्यांना प्रेरणा, सकारात्मक विचार आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दिशा देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Previous Post Next Post