जळगाव जामोद(प्रतिनिधी):
नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण कुटुंब शेगाव येथे गेले असताना सुनगाव येथे काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. घरात खेळता खेळता भिंतीवरील लोखंडी खुंटीला नायलॉनची दोरी अडकवून फास तयार करण्याचा प्रयत्न करत असताना आठ वर्षीय चिमुकला त्यात अडकला आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण सुनगाव गावावर शोककळा पसरली आहे.मृतक चिमुकल्याचे नाव आदित्य रमेश मिरटकार (वय ८ वर्षे) असे आहे. आदित्य हा सुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत होता.ही हृदयद्रावक घटना २४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. शेगाव येथे नातेवाईकाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याने आदित्यचे आई-वडील, आजी-आजोबा आणि इतर नातेवाईक अंत्यविधीसाठी शेगाव येथे गेले होते.दरम्यान, आदित्यची आत्या त्याच्या मोठ्या भावाला पाहण्यासाठी बाजारात गेली होती.घरात खेळत असताना आदित्यने भिंतीवरील लोखंडी खुंटीला नायलॉनची दोरी अडकवून फास तयार केला. मात्र, खेळता खेळता तो फास त्याच्याच गळ्यात अडकला आणि तो खाली कोसळला. काही क्षणांतच ही दुर्दैवी घटना घडली.घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आई-वडील, आजी-आजोबा आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. आत्याच्या मांडीवर असलेले आदित्यचे पार्थिव पाहून परिसरातील महिलांसह उपस्थित नागरिकही गहिवरून गेले.घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल, PSI गणेश कायंदे, PSI नागेश खाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश पुंडे, स्वप्निल म्हस्के आणि स्वप्निल झुंजारकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.यानंतर आदित्यचे पार्थिव जय भवानी रुग्णवाहिकेचे चालक राजू बुटे यांच्या मदतीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.रात्री शोकाकुल वातावरणात आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्याच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण सुनगाव गाव हळहळले असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविकांत बावस्कर करीत आहेत.
एका निष्पाप बालकाचा असा दुर्दैवी अंत…
खेळण्याच्या वयात काळाने हिरावून नेलेल्या आदित्यच्या निधनाने सुनगावचे समाजमन सुन्न झाले आहे.
