बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी);
रक्ताचा प्रत्येक थेंब कुणासाठी तरी जीवनाची नवी आशा ठरू शकतो! याच मानवतावादी विचारातून जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत १ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यात तब्बल १००० तरुणांच्या सहभागातून महा रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जळगावच्या मातीतून पुढे आलेले धावपटू पंजाब म्हासाळ यांच्या नेतृत्वात हा भव्य सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.एकाच दिवशी जिल्ह्यातील १००० युवकांना रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यासाठी एकत्र आणण्याचा संकल्प करण्यात आल्याने हा उपक्रम लक्षवेधी ठरणार आहे. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने जनजागृतीसोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारी कृतीतून दाखविण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.
अपघात, गंभीर आजार, शस्त्रक्रिया तसेच विविध वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता भासते. अशावेळी स्वेच्छेने पुढे येणारा रक्तदाता एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या जीवनासाठी आशेचा किरण ठरू शकतो. त्यामुळे ‘रक्तदान करा, जीवनदान द्या’ हा संदेश तरुणाईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे युवकांना केवळ कार्यक्रमापुरते एकत्र न आणता आरोग्य, सामाजिक बांधिलकी, मानवता आणि स्वेच्छा रक्तदानाची चळवळ अधिक मजबूत करण्याचा संकल्प या महा रक्तदान शिबिरातून केला जाणार आहे.
पंजाब म्हासाळ यांच्या नेतृत्वात युवकांची नवी चळवळ
क्रीडा क्षेत्रासोबतच सामाजिक उपक्रमांमध्ये युवकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेणारे पंजाब म्हासाळ यांच्या नेतृत्वात या महा रक्तदान शिबिराची तयारी करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांतील युवकांना या सामाजिक कार्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
एक दिवस... एक संकल्प... एक हजार तरुण आणि उद्देश फक्त एक—गरजूंसाठी रक्तदान! अशा व्यापक संकल्पनेतून होणारा हा उपक्रम यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील तरुणाईच्या सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे.जागतिक एड्स दिनी जनजागृतीचा संदेश देतानाच रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेची ज्योत अधिक प्रखर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होणार आहे. १ डिसेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाई रक्तदानासाठी मोठ्या संख्येने एकवटणार असल्याने या महा रक्तदान शिबिराकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
