पाणीपुरवठ्याच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही; जनतेला नियमित पाणी मिळालेच पाहिजे! — आ. डॉ. संजय कुटे..१४० गाव पाणीपुरवठा योजनेचा घेतला सविस्तर आढावा;निमखेडी योजना फेब्रुवारीअखेर पूर्ण करा, राजुरा योजना सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश;


 पाणीपुरवठ्याच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही; जनतेला नियमित पाणी मिळालेच पाहिजे! — आ. डॉ. संजय कुटे..१४० गाव पाणीपुरवठा योजनेचा घेतला सविस्तर आढावा;निमखेडी योजना फेब्रुवारीअखेर पूर्ण करा, राजुरा योजना सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश;

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

पाणीपुरवठ्याच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. जनतेला पुरेसे आणि नियमित पाणी मिळालेच पाहिजे, ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे. पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा, कामांमध्ये अडचणी असल्यास पर्यायी व्यवस्था उभी करा आणि प्रत्येक कामाची जबाबदारी निश्चित करा, असे स्पष्ट निर्देश जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिले.शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी शेगाव येथील देशमुख मंगल कार्यालयात आयोजित दुष्काळ नियोजन व विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विशेषतः १४० गाव पाणीपुरवठा योजनेसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.

निमखेडी पाणीपुरवठा योजनेचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच राजुरा पाणीपुरवठा योजना सोमवारपासून सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले. १४० गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामात मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास तातडीने कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. निधीची अडचण असल्यास मी स्वतः पैसे उपलब्ध करून देईन; मात्र मनुष्यबळाअभावी कोणतेही काम थांबता कामा नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.बैठकीदरम्यान अपूर्ण कामे आणि प्रशासकीय दिरंगाईबाबत आमदार कुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. 'हू इज रिस्पॉन्सिबल?' असा सवाल उपस्थित करत केवळ सरपंच किंवा लोकप्रतिनिधींवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, तर प्रत्येक विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कामे अपूर्ण राहण्याची कारणे सांगण्यापेक्षा ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्या. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलसंधारणाची अपूर्ण कामे, उपलब्ध पाणीस्रोतांचे नियोजन, पाणीपुरवठा योजनांची देखभाल आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासनाने केवळ कागदोपत्री अहवाल सादर न करता प्रत्यक्ष कामाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करावे आणि नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कोणत्याही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. जनतेला पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असून, जनतेच्या मूलभूत प्रश्नांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम निर्धार आमदार डॉ. संजय कुटे यांनी या बैठकीत व्यक्त केला.या बैठकीतून पाणीपुरवठा योजनांना गती देण्याबरोबरच प्रशासनातील जबाबदारी निश्चित करण्यावर आमदार कुटे यांनी विशेष भर दिल्याचे दिसून आले.

Previous Post Next Post