दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा दिलासा! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार ५ हजारांची अग्रिम मदत; भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्याकडून देवाभाऊंचे अभिनंदन...


 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा दिलासा!

दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार ५ हजारांची अग्रिम मदत; भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्याकडून देवाभाऊंचे अभिनंदन...

जळगाव जामोद, प्रतिनिधी :

महाराष्ट्रावर गेल्या पाच दशकांत अनुभवला नाही असा भीषण दुष्काळ ओढवला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांचे अग्रिम अर्थसहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जळगाव जामोद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन केले.या निर्णयामुळे राज्यातील साडेतीन लाख कुटुंबांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होऊन संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे सचिन देशमुख यांनी सांगितले.

दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या यंत्रणांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सक्त तंबी दिली आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चारा नियोजन आणि पीक व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे देशमुख यांनी म्हटले.दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा देणाऱ्या पिकांचे नियोजन केले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याचा निर्णय घेऊन पशुधन वाचविण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले.विरोधकांनी राजकारण न करता जनतेच्या हिताचा विचार करावा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती ही नैसर्गिक आपत्ती असून अशा संकटाच्या काळात सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, या प्रश्नावर विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याची खंत भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी व्यक्त केली.राज्यात साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा मोफत, कर्जवसुलीच्या तगाद्यातून शेतकऱ्यांना दिलासा, ५ हजार रुपयांची अग्रिम मदत तसेच दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी अशा विविध निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला.

याशिवाय राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना २ हजार रुपयांची भाऊबीज देण्याचा निर्णय घेऊन सरकारने संवेदनशीलता दाखविल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांना १२ हजार रुपयांचा वार्षिक सन्मान निधी मिळत असून, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून ६ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सचिन देशमुख यांनी सांगितले.पीएम किसान सन्मान योजना, नमो शेतकरी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील राज्याचा सहभाग, कृषी पंपांना वीजबील माफी आणि दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत अशा विविध योजनांच्या माध्यमातून फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली असताना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केवळ अडीच हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केल्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी लक्ष वेधले.महाराष्ट्रातील मदत कर्नाटकापेक्षा दुप्पट असल्याचा दावा करत, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा त्यांनी उल्लेख केला. काँग्रेसशासित राज्यांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या धर्तीवर ठोस उपाययोजना कराव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. बळीराजाच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र या. पुढील पिढ्यांना दुष्काळाच्या संकटातून कायमची मुक्ती देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला सर्वांनी बळ द्यावे,” असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जळगाव जामोद यांनी केले.

Previous Post Next Post