अर्जुन खिरोडकार/हिवरखेड(प्रतिनिधी);
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वान वन्यजीव परिक्षेत्रात गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींवर वनविभागाने धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात ४ बैलांसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी एस. ए. आंबेकर यांना १४ ऑक्टोबर २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वनविभागाचे पथक वान अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील उत्तर नागरतास बिट, वनखंड क्रमांक १२५६ येथे गस्तीवर होते. यावेळी दोन व्यक्ती ४ बैलांची अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्या.
वनविभागाच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. प्राथमिक चौकशीत सदर वाहतूक अवैध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गणेश अंतरसिंग भुयटे (वय ३७, रा. चंदनपूर, ता. तेल्हारा, जि. अकोला) आणि अंतरसिंग नारसिंग आहोर्या (वय ४८, रा. दिवानझरी, ता. तेल्हारा, जि. अकोला) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.या प्रकरणी वनगुन्हा क्र. ०३/२०२६, दि. १४/१०/२०२६ दाखल करून ४ बैल जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.सदर कारवाई भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम २६ (A-1)(a), २६ (१) फ व ५२ तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम २७, २९, ३१, ५१(१-C) अंतर्गत करण्यात आली आहे.ही कारवाई चंद्रशेखर बाला, भा.व.से., वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती;आर. एस. टोलिया, भा.व.से., उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग; तसेच जी. पी. टेकाळे, सहाय्यक वनसंरक्षक, अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत वनरक्षक सतीश देशमाने,प्रमिला जावरकर (उत्तर नागरतास बिट), थोटे यांच्यासह क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
वनविभागाचे नागरिकांना आवाहन
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची संख्या वाढत असल्याने प्रकल्पालगतच्या नागरिकांनी व्याघ्र प्रकल्पात अनधिकृत प्रवेश, अवैध वनचराई तसेच गोवंश तस्करीसारखे प्रकार करू नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वनक्षेत्रात कोणताही अवैध प्रकार निदर्शनास आल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन वनविभागाला सहकार्य करावे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी, वान वन्यजीव परिक्षेत्र यांनी सांगितले.
