जळगाव जामोद(प्रतिनिधी);
विद्या भारती शैक्षणिक मंडळ, अमरावतीद्वारा संचलित सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयात शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५८ वी पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोळंके सर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्याचा, महान विचारांचा आणि समाजप्रबोधनासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा सविस्तर परिचय करून दिला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या विचारांतून समाजाला एकता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, ग्रामविकास आणि मानवसेवेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने आपल्या जीवनात करावे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक सचिन इंगळे, राजपूत मॅडम, अढाव सर, अतुल डिके, तेजस बोंबटकर, शुभम कुलट, उमेश पाटील, अतुल पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी विशाल वसूलकार, रामेश्वर कुनगाडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रसंतांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने हा अभिवादन कार्यक्रम पार पडला.
