राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 अंतर्गत तसेच भविष्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचखेडा यांच्या पुढाकारातून गावातील सार्वजनिक विहिरीच्या खालील बाजूस नदीपात्रात वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली.वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे, भूजल पातळीत वाढ करणे तसेच परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा घडवून आणणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. बदलत्या हवामानामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गावपातळीवर जलसंधारणाची कामे करणे आवश्यक आहे. याच दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला.या वनराई बंधारा उभारणीच्या कामावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सचिव, ग्रामरोजगार सेवक, गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच कृषी विभागाचे कृषी सहाय्यक उपस्थित होते. सर्वांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.गावातील पाणी उपलब्धता वाढविण्यासाठी आणि जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत चिचखेडा सातत्याने प्रयत्नशील असून, नागरिकांनीही अशा लोकसहभागाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.जलसंधारणातून समृद्ध गावाकडे वाटचाल करण्यासाठी ग्रामपंचायत चिंचखेडा यांचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
