भारतीय संविधान हा माणसाला सन्मानाने जगण्याचा विश्वास देणारा अमूल्य ठेवा! – प्राचार्य काटले मॅडम;त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आसलगाव बाजार येथे संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सामूहिक उद्देशिका वाचनातून घेतली संविधान संवर्धनाची शपथ!


भारतीय संविधान हा माणसाला सन्मानाने जगण्याचा विश्वास देणारा अमूल्य ठेवा! – प्राचार्य काटले मॅडम;त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आसलगाव बाजार येथे संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सामूहिक उद्देशिका वाचनातून घेतली संविधान संवर्धनाची शपथ!

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

भारतीय लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करण्यासाठी त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आसलगाव बाजार येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या वतीने गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या महान मूल्यांवर आधारित भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारले. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी प्राचार्य काटले मॅडम यांनी आपल्या मनोगतात भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, "माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा विश्वास देणारे भारतीय संविधान हा आपल्या देशाचा अमूल्य ठेवा आहे." मानवी मूल्यांचे जतन करणाऱ्या संविधानाची मुळे आज समाजाच्या प्रत्येक स्तरावर खोलवर रुजली आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्यांचा आदर करून त्यांचे जतन करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तसेच भारतीय संविधानातील मूल्यांशी आजन्म एकनिष्ठ राहण्याची आणि संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्याची सामूहिक शपथ घेतली.प्रा. रवींद्र निमकर्डे यांनी आपल्या मार्गदर्शनातून संविधानाने दिलेल्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायासह विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगासमोर लोकशाही मूल्यांवर आधारित राज्यघटनेचा आदर्श ठेवला, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

जगातील अनेक देशांमध्ये लोकशाही व्यवस्था विविध आव्हानांना सामोरी जात असताना भारतीय लोकशाही आजही भक्कमपणे टिकून आहे. यामागे भारतीय संविधानाने सामान्य माणसाला दिलेला अधिकार, न्याय आणि समानतेचा विश्वास महत्त्वपूर्ण असल्याचेही प्रा. निमकर्डे यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमाला योगेश वारुकार, प्रा. वाघमारे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाधिकारी प्रा. शरद गावंडे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.

Previous Post Next Post