शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी व फार्मर आयडी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी !- आ डॉ संजय कुटे


 शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी व फार्मर आयडी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी !- आ डॉ संजय कुटे 

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

जळगाव जामोद येथे दिनांक १९ नोव्हेंबर रोजी कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि महसूल विभागाची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेत असताना अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास आले आहे.शासनाने ई-पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आपल्या पिकांची ई-पीक पाहणी तातडीने पूर्ण करावी. कोणताही शेतकरी आवश्यक शासकीय मदत व लाभांपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ज्या गावांमध्ये किंवा शिवारांमध्ये नेटवर्कची समस्या अथवा इतर तांत्रिक अडचणी आहेत, अशा ठिकाणी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ऑफलाइन पद्धतीनेही ई-पीक पाहणी करण्याची व्यवस्था करण्याचे निश्चित करण्यात आले.शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ई-पीक पाहणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी आणि कोणताही पात्र शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घ्यावी, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

__शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणेला सूचना !__

शासनाच्या शेतकरी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अद्याप लाभ प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) पूर्ण करून घेण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, दुष्काळी परिस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रिम मदतीची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात आढावा घेऊन महसूल यंत्रणेला ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत प्रलंबित शेतकऱ्यांचे फार्मर आयडी लवकरात लवकर तयार करून देण्याच्या सूचना केल्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होईल.शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल यंत्रणा किंवा संबंधित विभागाकडून काही त्रुटी राहिल्यास भाजपा शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना आवश्यक सहकार्य करावे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.या बैठकीला तहसीलदार पवन पाटील, तहसीलदार प्रशांत पाटील तालुका कृषी अधिकारी जाधव यांचे सह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post