१७ वर्षीय मुलीला वारंवार फोन करून प्रेमाची मागणी; आईच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध पॉक्सो कायद्यासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल; जळगाव जामोद पोलिसांत कारवाईने खळबळ!
जळगाव जामोद (प्रतिनिधी) :
प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर दबाव टाकण्याचा आणि धमकावण्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला आहे. अवघ्या १७ वर्षीय मुलीला वारंवार फोन करून प्रेमाची मागणी करणे, भेटण्यासाठी तगादा लावणे आणि भेटायला आली नाही तर स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देणे, असा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडशिंगी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अजिक्य सुरेश तायडे (रा. संत ज्ञानेश्वर नगर, मलकापूर) हा तरुण वारंवार फोन करीत होता. 'तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला भेटायला ये; अन्यथा मी माझ्या जीवाचे काही बरेवाईट करून घेईन,' अशा शब्दांत तो मुलीवर भेटण्यासाठी दबाव टाकत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.या सततच्या फोनमुळे आणि धमकीवजा बोलण्यामुळे मुलगी त्रस्त झाली. अखेर तिने धाडस करून संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीच्या आईने याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजिक्य सुरेश तायडे याच्याविरुद्ध अप. क्र. ७४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५१(२) तसेच पॉक्सो कायदा कलम १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा १४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७ वाजून २८ मिनिटांनी नोंदविण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे करीत आहेत.प्रेमाच्या नावाखाली वारंवार फोन करणे, भेटण्यासाठी दबाव टाकणे आणि धमकी देणे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पालकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली असून, प्रकरणाच्या पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
