हरिसाल च्या वनपरिक्षेत्रधिकरी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या नंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यरत महिला कर्मचारी वरील अन्यायाच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. तीन महिण्यात चार प्रकरणे उघडकीस आली आहेत. चौराकुंड परिक्षेत्रात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासातील दारावर मध्यरात्री वनपरिक्षेत्रधिकरी व कनिष्ठ लिपिकाने मध्यधूंद अवस्थेत लाथा घालून शिवीगाळ केली. यात लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे. तर बेपत्ता वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयात पाठविण्यात आला आहे. नीलेश सुरजुसे असे निलंबित करण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. संतोष बाबुराव सुरसाम नामक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव सिपणा वन्यजीव विभागातर्फे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसचांलक तथा मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.15 जुलैला मध्यरात्री या दोघांनी धिंगाणा घातला. परीविक्षाधीन आय एफएस अधिकारी मधुमिता एस. यांच्या समितीने केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या कनिष्ठ लिपिकाला निलंबित करून विभागिय चौकशी लावली आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर कारवाई साठी वरिष्ठ कार्यालयात पत्र पाठविण्यात आले आहे.
दीड वर्षांपासून आर एफ ओ गैरहजर
चौराकुंड येथिल आर एफ ओ संतोष खुलसाम दीड वर्षापासून कर्तव्यावर गैरहजर आहे. घटनेच्या दिवशी येऊन त्याने हा प्रकार केला व पुन्हा बेपत्ता झाला आहे. हरिसाल येथे बुधवारचा आठवडी बाजार असतो. मटन, दारू पार्टी झाल्यानंतर हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.
तीन महिन्यांत चार प्रकरणे उघडकीस
हरिसाल येथिल वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विविध वन्यजीव विभागामध्ये महिला कर्मचाऱ्यावरील अन्याया संदर्भात चार प्रकरणे उघडकीस आली आहेत. यातील दोन मेळघाट वन्यजीव विभागातील असुन एका प्रकरणात दोषी आढळलेल्या वनपालास बुलढाणा जिल्हात बदलीवर पाठविण्यात आले. दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी बाकी आहे. दोन गभिंर प्रकरणे घडल्यावरसुध्दा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा पदभार वर्षभरापासून एकाच वनपालावर असल्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे. सिपना वन्यजीव विभागात चौराकुंड नंतर सेमाडोह परिक्षेत्रात ही चौथी घटना उघडकीस आली आहे.
या चारही प्रकरणाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. चौराकुंड येथिल कनिष्ठ लिपिकाला निलंबित करण्यात आले असून वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कारवाई संदर्भात पत्र वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आले आहे.
-कमलेश पाटील, सहायक वनसंरक्षक सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर तीन महिन्यांमध्ये चार प्रकरणे उघडकीस आली आहेत. महिलांवरील अन्यायाच्या घटना घडणे ही गंभीर बाब आहे. त्यासाठी संघटने मार्फत यावर सुधारणा करण्यासंदर्भात वरिष्ठांना विचारण्यात येईल. - इंद्रजित बारस्कर, प्रदेश महासचिव
महाराष्ट्र वनरक्षक - वनपाल संघटना, नागपूर
