खांद शेकणी उत्साहात... बैलपोळ्यावर कोरोनाचे विरजण गोठ्यातच लागणार बैलाना घाट..


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

वर्षभर शेतकर्‍यासोबत राबणार्‍या ढवळ्या पवळ्या बैलाप्रती कृृृृतज्ञता व्यक्त करणारा सण पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा होत आहे. यंदाही बैलपोळ्यावर कोरोनाने विरजण घातल्याने पोळा भरण्यावर प्रतिबंध असल्याने बळीराजासह बैलमालक हिरमुसला.गणा रे गणा गण गेले वरच्या राना वरच्या रानातुन आणली माती ती दिली गुरुच्या हाती गुरुने घडविला महानंदी तो नेला पोळ्यामंदी एक नमन पार्वती गौरा हरहर महादेव अश्या झडत्या देत बळीराज्याच्या दैवताचा पोळा हा सण आज सोमवारी साजरा होत आहे. मात्र कोरोना महामारीने सार्वजनिक ठिकाणी सण ऊत्सव साजरा करण्यावर प्रतीबंध घातल्याने बैल पोळ्यात तोरणाखाली घाट लागणार नसल्याने सालभर राबला पुर्बी नाही जेवला. अशी गत ढवळ्या पवळ्या बैलासह शेतकर्‍याची झाल्याने नाराजीचा सुर उमटत आहे.रविवारी वाटबैलांची पुजा करुन खांदशेकणी झाली. वर्षभर बैलाच्या खांद्यावर असणारे जु (जुवाळी) समोर पुर्वीचा सालगडी सध्याचा बैलजोडी सांभाळणारा किंवा बैलमालकच लोणी व हळद एकत्र करुन सोबत चमकुरा (अळुच्या) पानाची बेसन वड्या ज्या वाफेवर शिजवुन तयार केलेल्या त्या खांद्यास चोळुन शेकल्या जाते. पुजा करुन शिंगोटीस करदोडा बांधुन घरधनी बैलाच्या कानात तुत्यानं मारलं काडीनं झोडलं सारं माफ करा आजचं आवतन उद्याचं जेवण कबुल करा अस सांगीतल्या गेले. वर्षभर अविरत श्रम करणार्‍या बैलांना पोळ्याला विश्रांती मिळते ते आज खांदशेकणीला.आज ग्रामीण भागात खांदशेकणी बैल मालकानी उत्साहात साजरी केली. तसेच पोळ्याकरीता बैलाना सजविण्याकरीता साज खरेदी केला मात्र शासनाने प्रतिबंध घातल्याने बैल पोळ्यातील तोरणाखाली उभे राहुन गावपाटलाच्या हातुन घाट लागणार नाही व पुजन होणार नसल्याने शेतकर्‍यानी नाराजी व्यक्त केली. याबाबत बैलमालकाना विचारणा केली असता जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक प्रशासनाच्या सम्मतीने होवु शकते, राजकिय नेत्यांचे गावोगावी भव्य दिव्य दौरे होत आहे मात्र कृृृृषीप्रधान देशात बैलपोळ्यावर बंदी हे जगातील आठव्या आश्चर्यासारखे म्हणावे लागेल अशी कोपरखळी मारली.

Previous Post Next Post