शेती नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा:-खासदार प्रतापराव जाधव..


 बुलडाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातल्या बदलामुळे संततधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात नऊ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. खरीपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतात पाणी तुंबल्याने पीक काढनी हंगाम कसा करावा अशी चिंता शेतकर्‍यांसमोर आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे महसूल व कृषी विभागाने संयुक्तरित्या करावेत अशा सूचना वजा आवाहन केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव साहेब यांनी केले आहे.सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.  या मुसळधार पावसामुळे  अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांची जनावरे सुद्धा वीज पडून किंवा पुरात वाहून मृत पावली आहे.  या नैसर्गिक संकटामुळे मोठे  नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, अशा सूचना  केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव साहेब यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना दिल्या आहेत. माय बाप शेतकरी बांधवांनी सुद्धा त्यांनी पीक विमा काढला असेल अशांनी तात्काळ या संबंधित विमा कंपनी च्या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. शिवाय तालुका कृषि कार्यालय व संबंधित कृषी कार्यालयात रितसर तक्रार अर्ज करून त्याची पोच पावती सोबत ठेवावी असे आवाहन सुद्धा खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.येळगाव, पेनटाकळी व खडक पूर्णा या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काही मध्यम प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते वाहतुकीवर परिणाम होत आहे. वाहन चालकांनी सुद्धा काळजी घेऊन प्रवास करावा.

Previous Post Next Post