छ.शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पोर्टल सुरु करा व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्या.आ सौ श्वेताताई महाले यांची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी...


  प्रतिनिधी÷ 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पोर्टल सुरू करणे आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र परन्तु अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी सहकार मंत्री ना बाळासाहेब पाटील यांच्याकडे एक निवेदन देऊन केली आहे.दि 1सप्टेंबर 2021 रोजी सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठक आटोपल्या नंतर भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , बुलडाणा जिल्ह्यातील दिनांक ०१/०४/२०१२ पासून दि. ३१/०३/२०१६ यादरम्यान कर्ज घेतलेल्या आणि ३०/०६/२०१६ पर्यंत थकीत असलेल्या १.५० लाख रुपयापर्यंतचे 2,41,743  कर्जदार शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र होते, त्यापैकी 1,93,744 शेतकऱ्यांना 1054.16 कोटी रुपयांची कर्जमाफ़ी मिळाली आहे. परंतु अजूनही 47,999 शेतकरी कर्जमाफ़ीपासून वंचित आहेत. तसेच राज्याभरामध्ये हा पात्र परंतु वंचित शेतकऱ्यांचा आकडा लाखोमध्ये असल्याने राज्यभरातील लाखो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र असूनही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.वस्तुतः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करीत असतांना त्या कर्जमाफीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती. परंतु पोर्टल बंद असल्याने पात्र परंतु वंचित शेतकरी अजूनही थकीत असल्याने त्यांच्या कर्जावर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचे पोर्टल तातडीने सुरु करून २०१२ ते २०१६ यादरम्यानच्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा.  महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्तीमधील पात्र परंतु कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ द्या.तसेच दिनांक ०१/०४/२०१५ पासून दि. ३१/०३/२०१९ यादरम्यान कर्ज घेतलेल्या आणि दि. ३०/०९/२०१९ पर्यंत थकीत असलेल्या २ लाख रुपया पर्यंतचे 1,95,632 कर्जदार शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र होते. त्यापैकी संपूर्ण 1,95,632 शेतकऱ्याचा डाटा बैंकानी पोर्टलवर अपलोड केलेला आहे. त्यापैकी 1,78,179 शेतकऱ्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेली आहे. त्यापैकी 4,632 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. आतापर्यंत 1,71,017 शेतकऱ्यांना 1130.39 कोटी रुपयांची कर्जमाफ़ी मिळाली आहे, परंतु अजूनही 24,615 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात शासनाने कर्जमाफीची रक्कम जमा न केल्याने 24,615 शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 47,999 शेतकरी व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील 24,615 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही अशा 72,614  शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळत नाही, तसेच त्यांचे कर्ज थकीत असल्याने बँकांचे व्याज वाढत आहे. आणि कर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांकडून तगादा वाढल्याने बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी चिंतामुक्त करायचा की नाही?

आ सौ श्वेताताई महाले यांचा सवाल शेतकरी चिंतामुक्त करायचा आहे असे शासनाचे धोरण असतांनाही शासनाच्या चुकीने हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पोर्टल तातडीने सुरु करून आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र व वंचित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात तातडीने कर्जमाफीची रक्कम जमा करून दोनही योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा . असे न केल्यास शेतकरी खरोखरच चिंतामुक्त होईल का ? असा ही सवाल निवेदनात केला आहे.

Previous Post Next Post